पुणे: भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणााऱ्या व्यक्तीच त्यांच्या खूनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. मुख्य आरोपीनेच पूर्व वैमनस्यातून सतीश वाघ यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
नव्या माहितीनुसार, सतीश वाघ यांचा खून हा पूववैमनस्यातून झाला आहे. तसेच वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वाघ यांच्या खुनाचे आरोपी प्लानिंग करत होते. काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांच्याकडे अक्षय जावळकर नावाचा भाडेकरू राहायला होता. तोच खूनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी पवन शर्मा आणि नवनाथ अर्जुन गुरसाळे यांना यापूर्वीच अटक केली आहे.
दरम्यान अक्षय जावळकर आणि सतीश वाघ यांच्यात भांडण होते. याच भांडणातून दोघांमध्ये वैर निर्माण होते. या कारणावरून अक्षय जवळकर याने गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी पवन शर्मा याला वाघ यांना ठार मारण्याची सुपारी दिली होती. चार ते पाच दिवसांपूर्वी पवन शर्मा याने नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे आणि इतर साथीदारांसह कट रचला. तसेच अक्षय जावळकर यांच्याकडून सुपारीची रक्कम देखील स्वीकारली. सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकला गेले असताना ठरलेल्या योजनेप्रमाणे आरोपींनी आधी त्यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा खून केला.
वैयक्तिक कारणातूनच सतीश वाघ यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहे. ज्या गाडीतून वाघ यांचे अपहरण केले होते, त्या गाडीत आणखी दोघेजण होते. आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला आहे.