पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या दहशतवाद विरोधी शाखेकडून बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्या दोन एजेंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाराशे ते दीड हजार रुपयांपर्यंत बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देण्यात आल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी एटीबी दोन एजेंटचा शोध घेत आहे. याप्रकरणी संदीप बनसोडे आणि सुनील रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्तापर्यंत ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड, हाऊस कीपिंग स्टाफ यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळवून देण्यात आल्याचे समोर आले आहे. अनेक बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे पुण्यातील चतुर्शिंगी आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर काही ठिकाणी बनावट पोलीस ठाण्याचे नाव देऊन हे सर्टिफिकेट बनवण्यात आले आहेत.
एका नामांकित कंपनीत संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींचे देखील बनावट पोलीस व्हेरिफिकेशन असल्याची माहीत समोर आली आहे. आतापर्यंत पोलिसांकडे सादर करण्यात आलेले ४१ पोलीस व्हेरिफिकेशन हे बनावट आणि खोट्या कागदपत्राद्वारे बनवले असल्याचं उघड झाले आहे. दिघी आळंदी आणि चऱ्होली या परिसरात या एजेंटचा सुळसुळाट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.