पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. १४) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणकडून पुणे परिमंडलअंतर्गत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदारांची ४० हजारांवर तर कलम १३५ व १३८ अन्वये आलेली वीजचोरीची १२२ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली आहेत. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना सुरू आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या लघू व उच्चदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी (कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून) ही योजना आहे. पुणे परिमंडलातील सुमारे ४० हजारांवर वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली आहेत.
या योजनेनुसार एकूण थकीत रकमेतील व्याज व विलंब आकाराची संपूर्ण १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. केवळ मूळ थकबाकीचाच भरणा करावा लागणार आहे. शनिवारी (दि. १४) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार आणि वीजचोरीच्या प्रकरणातील वीजग्राहकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.