पुणेः एकाच भागात कारवाईच्या उपक्रमानंतर आता पुणे महानगरपालिकेने आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीत नसल्याने वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. चेंबरमुळे होणाऱ्या खड्यांमुळे अपघात होतात, तसेच पाठदुखी, कंबरदुखीचाही सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीत आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. १५ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली.
शहरात ड्रेनेजसह केबल्स, पावसाळी वाहिन्या आदींसाठी चेंबर खोदण्यात आली आहेत. मात्र, एकाही रस्त्यावर ही चेंबरची झाकणे रस्त्याच्या समपातळीत नाहीत. बहुतांश ठिकाणी खड्डे पडले असून, काही ठिकाणी उंचवटाही झाला आहे. यामुळे वारंवार अपघात होतात. त्यामुळे महापालिकेकडे सातत्याने तक्रारी केल्या जातात. दर वर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका चेंबरची झाकणे उचलून घेते. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नाही.
महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराने शहरातील सर्व रस्त्यांवरील चेंबरच्या झाकणांची व त्यामुळे झालेल्या खड्ड्यांची माहिती संकलित केली आहे. ही माहिती फोटो व अक्षांश- रेखांशासह पालिकेकडे उपलब्ध आहे. पालिकेच्या हद्दीसह समाविष्ट गावांमध्ये अशी १५०० हून अधिक चेंबर्स आहेत. पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चेंबरची झाकणे उचलून समपातळीत आणली जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र तरतूद केलेली नाही. पथविभागासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीतूनच हा खर्च केला जाणार आहे, असे पावसकर यांनी सांगितले.