हडपसर : भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची फुरसुंगी फाटा येथून दोन दिवसांपूर्वी सकाळी पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून चार जणांनी अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असताना उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळच्या सुमारास आढळून आला.
दरम्यान, पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत वाघोली येथून पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे या दोघांना ताब्यात घेतले. त्या आरोपींच्या चौकशीदरम्यान अन्य दोन आरोपींना देखील पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
याबाबत बोलतना पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, सतीश वाघ यांचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाल्याच्या घटनेनंतर राज्यातील अनेक भागात तपासासाठी पथके रवाना करण्यात आली होती. त्या दरम्यान जवळपास ४५० ठिकाणांचे सीसीटीव्ही तपासण्यात आले होते. या सर्व तपासादरम्यान काल सायंकाळच्या सुमारास सुरुवातीला दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन आरोपी असे एकूण चार आरोपी अटक करण्यात आले आहेत.
या आरोपींच्या चौकशीमध्ये सतीश वाघ यांचा काही दिवसांपूर्वी शेजारी राहणार्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्यातूनच सतीश वाघ यांना मारण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. यामधून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.