पुणे : केज तालुक्यामधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यासह राज्य हादरले आहे. या घटनेने दोन दिवसांपासून गावामध्ये चूल पेटली नाही. आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लातूर-बीड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले, तसेच आंदोलकांनी जाळपोळ केली. या प्रकरणात एकूण 6 आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली असून आज पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अजून तीन आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय केला जात आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी एका पीएसआयला निलंबित केले आहे.
पुण्यातून एकाला अटक…
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी अजून एका आरोपीला अटक केली. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. काल दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने आज पुण्यातून एकाला ताब्यात घेतले आहे. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात आली आहे.
सीआयडी चौकशी होणार
संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गावकऱ्यांकडून सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तर प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची पण नियुक्ती करण्यात येणार आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथक रवाना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि परळीतील व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. या घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांनी या घटनांवर चिंता व्यक्त केली. याप्रकरणी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.