पुणे : फेरफार नोंदीच्या नोटिसा आता टपाल विभागाकडून नागरिकांना मिळणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर पुणे विभागात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तर नवीन वर्षात राज्यभरात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे (नागरी भूमापन) उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी दिली.
राज्याच्या भूमी अभिलेख विभागाकडून आता मालमत्ता पत्रिकांवरील फेरफार नोंदीच्या नोटीस संबंधितांना देण्यासाठी टपाल विभागाला ऑनलाईन माहिती पुरवली जाणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर टपाल खात्याकडून नोटिसांचे वितरण केले जाणार आहे. नागरिकांना त्यामुळे वेळेत नोटिसा मिळणार आहेत. भूमी अभिलेख विभागातील देखभाल सर्वेक्षकाला (मेंटेनन्स सव्हें अर) नोटीस बजावताना नोटीस तयार झाल्यानंतर त्याची साक्षांकित प्रत काढावी लागत आहे. त्यानंतर पाकीटबंद करून पोस्टात टाकण्यास किमान आठवड्याचा कालावधी लागत होता.
काही खातेदारांना नजरचुकीने नोटीस बजावण्याचे राहून जाणे, नोटीस पोस्टात टाकल्यानंतर ती संबंधिताला मिळाली असल्याचा कोणताही पुरावा नसल्याने अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) मदतीने संरक्षित ऑनलाईन यंत्रणेद्वारे संकेतस्थळामध्ये टपाल विभागासाठी विशेष खिडकी उपलब्ध करून दिली आहे. खातेदारांना त्याची नोटीस बजावण्याची जबाबदारी आता टपाल कार्यालयावरच टाकण्यात आली आहे.
मालमत्ता पत्रिकेत फेरफार करण्यासाठी राज्यभरातून ४ लाख प्रकरणे वर्षभरात केली जातात. त्यापैकी ३ लाख प्रकरणे प्रमाणित करण्यात येतात. प्रमाणित करण्यात आलेल्या प्रत्येक मालमत्ता पत्रिकेवर किमान चार जणांना भूमी अभिलेख विभागाकडून नोटीस बजावल्या जातात. अशा नोटिसांची संख्या वर्षाला १२ ते १५ लाख होते. एकंदरीत महिन्याला एक लाख, तर प्रतिदिवस ४ हजार नोटीस पाठवाव्या लागत होत्या. मात्र, आता याची जबाबदारी टपाल विभागालाच देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत नोटिसा मिळणार आहेत.