अमरावती : एका तरुणीच्या नियोजित वराला फेक मेसेज पाठवून तिचे होऊ घातलेले लग्न मोडण्यात आले. तिच्याच वर्गमित्राने सोशल मीडिया प्लॅटफार्मवर फेक अकाउंट बनवून तिची बदनामी केली. ही घटना शनिवार, ७ डिसेंबर गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
धर्मेश योगेश तन्ना (३० वर्षे, रा. हिवरखेड, अकोला) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार, पीडित तरुणी व धर्मेश हे दोघे एकाच वर्गात शिकत होते. तेव्हापासून धर्मेश हा तरुणीचा पाठलाग करून लग्न कर म्हणून बळजबरी करीत होता. धर्मेशच्या या सततच्या त्रासाला कंटाळून ती अमरावतीला भावाकडे राहायला आली. त्यानंतरही धर्मेशने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी तरुणीचे पुणे येथील एका तरुणासोबत लग्न जुळले. त्यांचा साखरपुडाही आटोपला. लग्नाची तारीखही ठरली.
दरम्यान, तरुणीचे लग्न ठरल्याची माहिती मिळताच धर्मेशने १५ ते २० सप्टेंबरदरम्यान तिच्या मोबाईलवर वारंवार फ्लॅश मेसेज पाठविले. त्यामध्ये शिवीगाळ करून तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी होती. काही दिवसांनी धर्मेशने सोशल मीडिया प्लॅटफार्मवर एक फेक अकाउंट बनविले. त्यावरून त्याने तरुणीच्या नियोजित वराला खोटे मेसेज केले. तुम्ही ज्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या मुलीबद्दल मला काही सांगायचे आहे. तुम्हाला माहिती नाही की, त्या मुलीचे किती मुलांशी संबंध होते. तिच्या अशा वागण्यामुळे तिला तिच्या घरच्यांनी अमरावतीला पाठविले आहे. तिने तिच्या वहिनीचा भाऊ पण नाही सोडला. त्याच्यासोबतसुद्धा संबंध आहेत, असे त्या मेसेजमध्ये नमूद होते. त्यामुळे पीडित तरुणीचे लग्न मोडले.
यानंतर धर्मेशने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून स्वतःला देखील तसे मेसेज व काही अश्लील फोटो पाठवून ते पीडित तरुणीला दाखविले. आपल्यालादेखील तसेच मेसेज येत असल्याचा बनाव त्याने रचला. मात्र, तो बनाव त्याचा मोबाइल तपासल्यावर समोर झाला. त्यामुळे पीडित तरुणीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी धर्मेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.