लोणी काळभोर : या जगात कुणीच काहीही फुकट देत नाही. ज्या ठिकाणी असे सांगितले जाते, तेथे नक्कीच फसवणूक झाल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. याचा प्रत्यय सोलापूरकरांना आलेला आहे. पुण्यानंतर आता सोलापुरातही हजारो महिलांनाही घरी बसल्या काम देण्याचे आमिष दाखवून एका महिला गृहउद्योगाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या फसवणुकीची व्याप्ती अजूनही वाढण्याची शक्यता आहे. तर महिला गृहउद्योग समूहाचा संस्थाचालक फरार झाला आहे.
या उद्योग समूहाने महिलांना घरी बसल्या बसल्या काम देतो, शिवाय तो माल आम्हीच खरेदी करू, अशी बतावणी केली. तसेच या भामट्यांनी महिलांना घरी द्रोण-पत्रावळी बनवा, पेन्सिल पॅकिंगचे काम, उदबत्ती व मेणबत्ती बनवण्याचे काम करणे, मशिनवर कापसाच्या वाती करणे, वात बंडल करणे आदी कामे देतो. तसेच या वस्तू बनविण्यासाठी स्वस्तात मशिन उपलब्ध करून देत, कर्जाची सोयही करून देतो. एवढ्यावरच न थांबता भामट्यांनी हा केलेला मालदेखील आम्हीच खरेदी करू. तुम्हाला बाजारात जायचीच गरज नाही, अशा थापा मारुन महिला वर्गाला आपल्याकडे आकर्षित केले. असे सांगून महिलांकडून कागदपत्रे व पैसे घेतले आहेत.
सोलापूर शहरातील हजारो बेरोजगार महिलांना पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अनामत रक्कम म्हणून 2 हजार 50 रुपये घेण्यात आले. भडंग पॅकिंग, पापड उद्योग, मसाला पॅकिंग, पाणीपुरी पॅकिंग, चॉकलेट, फरसाण आणि चिवडा पॅकिंगला प्रत्येकी पाच हजार रुपये, तर पेन्सिल पॅकिंगला, पेन पॅकिंग, मेणबत्ती पॅकिंग, टिकली पॅकिंग, रबर पॅकिंग व अगरबत्ती पॅकिंगसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये, असे उद्योग समूहाच्या प्रमुखाने सोलापुरातील गवळी वस्ती, आमराई, दमाणीनगर, जुनी लक्ष्मी चाळ, मरिआई चौक आदी भागातील महिलांकडून वसूल केले होते.
दरम्यान, या बदल्यात एका महिलेला दररोज 200 रुपये वाटप केले जाईल, असे सांगण्यात आले. शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन या महिलांना दररोज पॅकिंगला दिला जात होता. त्यांच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, असे आश्वासनही दिले होते. महिना पूर्ण झाल्यावर तुमचा हिशेब केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. सुमारे १ हजारहून अधिक महिलांची अनामत रक्कम घेऊन संस्थाचालक फरार झाला असल्याचे उघडकीस आले आहे.
तक्रार कोठे करावी
1). घटनेच्या 24 तासांच्या आत तक्रार नोंदवावी.
2). गुन्ह्याची तक्रार योग्य एजन्सी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना करावी.
3). सायबर फसवणुकीच्या बाबतीत, सायबर-क्राइम हेल्पलाइन नंबर 1930 डायल करावा.
4). गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे गोळा करावीत, जसे की बँक स्टेटमेंट, क्रेडिट रिपोर्ट इत्यादी.
5).www.cybercrime.gov.in वर लॉग इन करूनही तक्रार देता येते.