मुंबई : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनीष निकोसे नामक व्यक्तीने आमदार लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली आहे. याबाबत प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात रीतसर दिली आहे. त्यानंतर देखील मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने लाड यांना आज (दि. १०) पुन्हा एकदा धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. दोन हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन, असे या धमकीत म्हटल्याने राजकीय वर्तुळाच खळबळ उडाली आहे. जर सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या प्रमुख आमदारांना धमकी येत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्नही या निमित्ताने उभा राहत आहे.
आपण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, तर कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सदर व्यक्ती सांगत आहे. या व्यक्तीची कसून चौकशी करून त्याच्यावर धमकीचा गुन्हा करत त्यास अटक करावी, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे.