राहुलकुमार अवचट / यवत : मिक्सल मार्शल आर्ट्स महासंघ इंडिया यांच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल कॉम्बट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये जुन्नर तालुक्यातील राजुर गावातील आदिवासी समाजातील सृष्टी अविनाश मुंढे आणि शिवराज अविनाश मुंढे या बहीण-भावांनी चांदीचे पदक पटकावून जुन्नर तालुक्याचे व आदिवासी समाजाचे नाव उंचावले आहे. प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल, मुलुंड वेस्ट मुंबई येथे रविवार (दि. 8) इंटरनॅशनल कॉम्बट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप संपन्न झाली.
सृष्टी ही सध्या पुणे येथील केंद्रीय विद्यालयात इयत्ता 6 वी तर शिवराज हा श्री संत तुकाराम विद्यालय, लोहगाव येथे इयत्ता 5 वीत शिक्षण घेत आहेत. दोघेही वॉरियर स्पोर्ट्स मधील ब्रिलियंट प्री प्रायमरी स्कूल, लोहगाव येथे कराटे क्लासचे शिक्षण घेत असून कराटे शिक्षक मुकेश वाल्मीकी यांनी या बहिण भावांनी मुंबई येथे पार पडलेल्या स्पर्धेत यश प्राप्त केल्याने समाधान व्यक्त केले आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल सृष्टी मुंढे आणि शिवराज मुंढे यांचे गावातील नागरिक, मित्र मंडळ आणि शिक्षकवर्ग यांनी अभिनंदन केले. ही दोन्ही मुले भविष्यातही अशाच प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या जुन्नर तालुक्याचे आणि राज्याचे नाव उंचावतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.