नवी दिल्ली: वाढत्या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे पृथ्वीवरील जमीन मोठ्या प्रमाणात शुष्क होत चालल्याचे चिंताजनक चित्र आहे. १९९० ते २०२० दरम्यान पृथ्वीवरील ७७ टक्क्यांहून अधिक जमीन यापूर्वीच्या तीन दशकांच्या तुलनेत अधिक शुष्क झाली आहे. जर हरितगृह वायू उत्सर्जनाला आळा घालण्यात अपयश आले, तर पृथ्वीवरील आणखी ३ टक्के जमीन या शतकाच्या अखेरपर्यंत शुष्क होईल, असा इशारा एका नवीन अहवालातून देण्यात आला आहे.
सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या एका परिषदेत (यूएनसीसीडी) यासंबंधित अहवाल जारी करण्यात आला, वाळवंटीकरणाचा सामना करण्याच्या मुद्यावर आयोजित परिषदेत गहन चर्चा केली जात आहे. परिषदेतील अहवालानुसार १९९० ते २०२० दरम्यान पृथ्वीवरील ७७ टक्क्यांहून अधिक जमीन यापूर्वीच्या तीन दशकांच्या तुलनेत अधिक शुष्क झाली आहे. याच कालावधीत जागतिक शुष्क जमीन अंदाजे ४३ लाख चौरस किमीने विस्तारली आहे. हा भाग भारताच्या क्षेत्रफळापेक्षा जवळपास एक तृतीयांश अधिक मोठा आहे.
शुष्क भूभाग वाढत असताना या कोरडवाहू प्रदेशात राहणाऱ्या लोकांची संख्या ३० वर्षांत वाढून दुप्पट म्हणजे जवळपास २.३ अब्ज इतकी झाली आहे. जर हवामान बदलाची गंभीर स्थिती अशीच राहिली तर २१०० सालापर्यंत शुष्क प्रदेशात राहणाऱ्यांची संख्या ५ अब्जच्या घरात जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या वाळवंटीकरण आणि शुष्कीकरणामुळे या अब्जावधी लोकांवर अतिशय खडतर स्थितीत जगण्याची वेळ येईल, असा इशारा आहवालातून देण्यात आला आहे.
शुष्कतेने सर्वाधिक प्रभावित ९६ टक्के भागामध्ये युरोप, पश्चिम अमेरिका, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि आशियातील मोठ्या प्रदेशांचा समावेश आहे. भूमध्य समुद्रातील जे देश कधीकाळी मजबूत कृषी क्षेत्राचे देश म्हणून ओळखले जात होते, त्यांनादेखील अर्ध-शुष्क स्थितीचा सामना करावा लागत आहे. दक्षिण सुदान आणि टांझानियातील मोठ्या भूभागाचे शुष्क भागात रूपांतर झाले आहे. चीनला देखील व्यापक प्रमाणात या स्थितीचा सामना करावा लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जन आटोक्यात आणण्याकरिता व्यापक उपाययोजना करण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.