पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. ही बातमी समोर येताच सर्वत्र मोठी खळबळ माजली होती. मामा सतिश वाघ यांच्या खूनाबद्दल आमदार योगेश टिळेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना आमदार योगेश टिळेकर म्हणाले, “माझ्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलीस यंत्रणा काम करून लवकरच आरोपींचा शोध घेतील. माझी पोलिस यंत्रणा काही वेळात याचा सुगावा लावेल, त्यासंदर्भात त्याचं काम सुरू आहे. यात राजकारण न करता पोलीस आपलं काम करतील. सामान्य माणूस असो किंवा आमदारांचा मामा असो शेवटी ही यंत्रणा आहे. सामान्य नागरिक याच्यावर अन्याय झाला तरी राज्य सरकार चांगलं काम करते. मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी फोन केले आहेत, माझ्या कुटुंबीयांच्या मागे सर्वजण खंबीरपणे उभे आहेत, अशा शब्दात पोलिस यंत्रणांकडून वेगाने तपास सुरू असल्याचं त्यांनी बोलताना म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं ?
सतीश वाघ हे ब्लु बेरी हॉटेलसमोर सोमवारी (ता. 09) सकाळी सहा वाजण्याच्या मॉर्निंग वॉक करीत होते. यावेळी अचानक एक चारचाकी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली. त्या गाडीतून दोन अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना गाडीत बसवून अपहरण करण्यात आलं आहे. मृतदेह सापडल्यानंतर मृतदेहाशेजारी लाकडी दांडका पोलिसांना आढळून आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यु नक्की कशाने झाला आहे ते समजेल असे पोलिसांनी सांगितले.