बेंगळुरू : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे मंगळवारी (दि. 10 डिसेंबर) पहाटे 2.45 वाजता राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रेमा, दोन मुली शांभवी आणि मालविका आहेत.
एस. एम. कृष्णा यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आयटी क्षेत्राला चालना दिली, ज्यामुळे कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीला पर्याय म्हणून बंगळुरुचा विकास झाला आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण झाला. बंगळुरुची ‘सिलीकॉन व्हॅली’ करण्यात त्यांचा मोठा हातभार होता.
एस. एम. कृष्णा हे राजकारणातले दिग्गज नेते मानले जात. 2017 मध्ये भाजपात प्रवेश केल्यापासून राजकीयदृष्ट्या ते निष्क्रिय होते. आपल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल या पदांसह अनेक महत्त्वाची सार्वजनिक पदं भुषवली होती. अमेरिकेतल्या लॉ स्कूलचे अत्यंत हुशार विद्यार्थी असलेले कृष्णा हे वोक्कलिगा समुदायातले आहे. त्यांचं मूळ गाव मंड्या जिल्ह्यातील मद्दूर हे आहे जे जुन्या मैसूर प्रदेशाचा भाग आहे.