संगमनेर : संगमनेर तालुक्यातील सांगवी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हाणामारीच्या गुन्ह्यातील आरोपीचा रात्रीच्या वेळी पाठलाग करत असताना पोलिस पथकातील एक कर्मचारी व आरोपीच्या पाठोपाठ विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी रात्री तालुक्यातील सांगवी परिसरात घडली आहे. यात आरोपीला अटक करण्यात आली असून, जखमी झालेल्या पोलिसावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी आरोपी संपत शांताराम गागरे याने मामा आणि मामीला बेदम मारहाण केली. यानंतर तो फरार झाला होता. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलीस त्याचा शोध घेत घेत होते. बरेच दिवस झाले पोलिस तपास करत असताना खबऱ्याकडून तो संगमनेर तालुक्यात आल्याची माहिती पोलिसांना समजली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिस गेले असता आरोपीने पोलिसांना हिसका देऊन पलायन केले. पोलिस पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र, तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. हातात आलेले सावज गेल्याचे पाहून पोलिस पथकातील सर्व कर्मचारी आरोपीच्या मागे धावत गेले. बराच वेळ हा पाठलाग सुरू होता. आरोपी पळाला त्या दिशेने पोलिस पथकातील सर्वजण त्याच्या पाठीमागे होते. रात्र असल्याने पोलिसांना अडचण येत होती.
सांगवी गावामध्ये एका घासाच्या शेतातून आरोपी गागरे पळत होता. त्याचा पाठलाग पोलिस नाईक उगले करत होते. रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने दोघेही एकापाठोपाठ विहिरीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला पोहता येत असल्याने तो पोहत होता. मात्र पोलिसाला पोहत येत नव्हते. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांना बाहेर काढले. आरोपीला अटक करण्यात आली, तर पोलिस किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.