लोणी काळभोर : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांचा मृतदेह शिंदवणे (ता. हवेली) घाटात सोमवारी (ता.9) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आढळला आहे. या घटनेमुळे हडपसर सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सतीश सादबा वाघ (वय-55) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी त्यांचा मुलगा ओंकार सतीश वाघ (वय-28) यांनी अपहरणाची हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ हे शेवाळवाडी येथील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. वाघ हे ब्लु बेरी हॉटेलसमोर सोमवारी (ता. 09) सकाळी सहा वाजण्याच्या मॉर्निंग वॉक करीत होते. यावेळी अचानक एक चारचाकी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली. त्या गाडीतून दोन अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना गाडीत बसवून अपहरण केल्याची घटना घडली होती.
या घटनेची माहिती मिळताच, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. व त्वरित तपासाच्या दिशेने पथके तयार करून आरोपींच्या मागावर रवाना केले होते.
दरम्यान, पुणे शहर पोलीस तपास करताना, पोलिसांना अपहरण कर्त्यांची गाडी पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेकडे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले होते. त्या अनुषंगाने पोलिसांचे पथके उरुळी कांचन, यवत, केडगाव व पाटस परिसरात गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे घाटात सोमवारी (ता.९) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळला असून घटनास्थळी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे व त्यांचे सहकारी दाखल झाले आहेत.
खुनाचे कारण अस्पष्ट
सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असून शेवाळवाडी येथील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. सतीश वाघ यांचे चारचाकीतून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले होते. हे अपहरण कशासाठी केले. याचा शोध घेत असताना, पोलिसांना सतीश वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात सापडला. म्हणजे हे केवळ अपहरण नव्हते तर यापाठीमागे हत्या करण्यासाठी अपहरणाचा रचलेला कट असल्याचे दिसून येत आहे. सतीश वाघ यांची अपहरणकर्त्यांनी हत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, पोलीस त्यादृष्टीकोनातून तपास करीत आहेत.