राहुरी : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी परिसरात वन विभागाच्या दुर्लक्षित भुमिकेने बिबट्याचा वावर मानवी वस्त्यांकडे वाढला आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या न कोणत्या गावात बिबट्याचे दर्शन होत असतानाच काल ताहाराबाद परिसरात मोठा अनर्थ टळला आहे. एका सहा वर्षीय चिमुरड्याला बिबट्याने जबड्यात घेतले. यावेळी वडिलांनी मोठ्या धाडसाने बिबट्याशी झुंज देत मुलाची सुटका केली.
दरम्यान, मुलाला बिबट्याचे दात लागल्याने त्यास सिव्हील हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. रुद्र सचिन गागरे (वय-६) असं बिबट्याच्या तावडीतून सुटका केलेल्या मुलाचे नाव आहे. ताहाराबाद येथील संत महिपती महाराज मंदिर परिसरात असलेल्या झावरे वस्तीवर काल रविवारी (दि. ८) सायंकाळी ६ वाजता हा थरार घडला आहे.
नेमकं काय घडलं?
सचिन गागरे हे ताहाराबाद येथील बाजाराचा दिवस असल्याने बाजारासाठी गेले होते. त्यांची पत्नी शेतामध्ये कामासाठी गेली होती. बाजार करून घरी परतल्यानंतर त्यांनी घरात पाहिले असता मुलगा रुद्र दिसला नाही. त्यामुळे ते मुलाला पाहण्यासाठी घराबाहेर आले. वडिलांची गाडी आलेली पाहून घराकडे धाव घेतलेल्या रुद्रवर लगतच्या काटवनात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घेतली.
रुद्र बिबट्याच्या तावडीत असल्याचे पाहून वडिलांनी जीवाची पर्वा न करता त्याचा सामना केला. यात सुदैवाने बिबट्याने रुद्रला तिथेच सोडून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात रुद्रच्या पाठीवर दाताच्या जखमा झाल्याने त्याला जवळच्या ताहाराबाद ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास अहिल्यानगर येथील सिव्हील रुग्णालयात नेण्यास सांगितले.