पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विकेंडला सुरू केलेल्या पर्यटन बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोन महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ४ लाख ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पीएमपीकडून विकेंडला पर्यटनासाठी आठ मार्गवर माफक दरामध्ये पर्यटन सेवा सुरू आहे. त्यामध्ये पीएमपीकडून आठवड्याच्या प्रत्येक शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही पर्यटन बससेवा सुरू असते. त्यासाठी स्मार्ट एसी ईलेक्ट्रिक बस उपलब्ध करून दिले जाते. प्रत्येकी ५०० रुपये तिकीट दर असून, प्रवाशांना माहिती देण्यासाठी या बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक केलेली असते. तसेच ज्या दिवशी बुकिंग केले त्या दिवशी सदर प्रवास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत आणि सायंकाळी पोहचल्यानंतर राहत्या घरापर्यंत बुकिंग केलेल्या तिकिटावर अन्य मार्गाच्या बसमधून प्रवास करता येऊ शकतो.
बुकिंग येथे सुविधा…
डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, मनपा भवन या पास केंद्रांवर पर्यटन बसचे बुकिंग करता येणार आहे. बसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीटात १०० टक्के सवलत मिळणार आहे, असे पीएमपीकडून सांगण्यात आले.