नाशिक : ‘माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत ओळख असून मी कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देऊ शकतो,’ असे आमिष दाखवत नाशिकमधील एकाने चेन्नईच्या ५६ वर्षीय व्यक्तीला तब्बल ५ कोटी ९ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी (४०, रा. श्री गंधर्वनगरी, नाशिकरोड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितास दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, चेन्नई येथील रहिवासी नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (५६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १२ जानेवारी २०२४ रोजी संशयित निरंजन कुलकर्णी याने फिर्यादीस आपल्याला नाशिकमधील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. या भेटीत कुलकर्णी याने ‘आपली अनेक राजकीय नेत्यांसोबत ओळख आहे. मी कोणत्याही राज्याचे राज्यपालपद आपल्याला मिळवून देऊ शकतो. या कामापोटी माझा सर्व्हिस चार्ज म्हणून १५ कोटी रुपये ‘द्यावे लागतील,’ असा प्रस्ताव दिला.
त्यानंतर पुन्हा याच हॉटेलमध्ये ७ फेब्रुवारी २०२४ रोजी कुलकर्णी याने फिर्यादी रेड्डी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ‘जर मी काम केले नाही, तर माझ्या नावे असलेल्या जमिनीचे खरेदीखत तुमच्या नावे करून देईल,’ असे सांगत रेड्डी यांना पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्प या प्रकल्पांजवळील शंभर एकर जमीन शासनाकडून भाडेतत्त्वावर घेतल्याबाबतचे भारत सरकारची मोहर असलेले बनावट दस्तऐवज व चांदशी (नाशिक) येथील त्याच्या नावावर असलेल्या जमिनीचे बनावट दस्तऐवज दाखवले. यातून रेड्डी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रोख स्वरूपात तसेच त्यांचे नातेवाईक व असोशिएट्स यांच्या बँक खात्यावरून ७ फेब्रुवारी ते २ एप्रिल यादरम्यान बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवत त्यापोटी ५ कोटी ०८ लाख ९९ हजार ८७६ रुपये रेड्डी यांच्याकडून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जिवे मारण्याची धमकी
रेड्डी यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संशयित निरंजन कुलकर्णी याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. मात्र, हे पैसे परत देण्याऐवजी कुलकर्णी याने रेड्डी यांना पैसे देण्यास नकार देत फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रेड्डी यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनुसार मुंबई नाका पोलिसांनी कुलकर्णी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक डॉ. मुदगल हे करत आहेत