पुणे : पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावरील सोन्याच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. अज्ञात तीन चोरटे दुचाकीवरून बी. टी. कवडे रोडपासून काही अंतरावर असणाऱ्या अरिहंत ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात आले. पिस्तूल डोक्याला लावून, डोळ्यात स्प्रे मारून दुकानदाराला लुटले. तसेच पाठीत उलटा कोयता मारून जखमी केले.
ही घटना रविवारी (दि. ८) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दुकानमालक वालचंद वसवाल (वय-७८) यांच्यावर वार करून सुमारे ३५ ग्रॅम सोने चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर अरिहंत ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून तिघेजण अरिहंत ज्वेलर्स या दुकानाजवळ आले. त्यातील दोघे दुकानात घुसले आणि एकजण गाडीवरच बसला होता. सराफी पेढीच्या मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवला. सराफी पेढीचे मालक घाबरले.
त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे फवारले. त्यानंतर कोयत्याचा दांड्याने मारहाण करुन सराफी पेढीतील दागिने लुटून दुचाकीवरून पसार झाले. सराफी पेढीच्या मालकाने या घटनेची माहिती वानवडी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित नाकाबंदी करण्याचे आदेश दिले असून पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.