पुणे : जिल्ह्यातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व ऑनलाइन सेवा विनाअडचण नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जे अधिकारी-कर्मचारी सेवा देताना कामात कुचराई करतील, अशांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला.
ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी, ई-पीक पाहणी, अॅग्रीस्टॅक, कजाप नोंदी, ईक्यूजे कोर्ट व महाखनिज या ऑनलाईन प्रकल्पांबाबत आढावा व मंडळ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, ई-फेरफार प्रकल्प राज्य संचालक सरिता नरके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
या वेळी जिल्ह्यातील सुमारे १५० मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. सुहास दिवसे म्हणाले की, नागरिकांना देण्यात येत असलेल्या ऑनलाईन सुविधांचे कामकाज सुरळीत होण्यासाठी सर्वांनी आलेल्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना कराव्यात. ई-फेरफार प्रकल्पात नोंदी प्रमाणित करण्यासाठीचा कालावधी देखील आणखी कमी करावा. तसेच राज्य सरकारचा अॅग्रीस्टॅक हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकरी ओळखपत्र करण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा.
ऑनलाईन सुविधा देण्यात कुचराई केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करू, असा इशारा ही डॉ. दिवसे यांनी या वेळी सर्व मंडळ अधिकाऱ्यांना दिला. तर मापारी म्हणाले, मंडळ अधिकाऱ्यांनी ई-हक्क प्रणालीतील नोंदी ऑनलाईन कशा कराव्यात, या संदर्भात नागरिकांची जागृती करावी. या ऑनलाईन सुविधांचा नागरिकांना जास्तीत जास्त लाभ करून द्यावा.