शिक्रापूर : नदीच्या कडेला पत्नीबरोबर गप्पा मारत असताना पाय घसरुन नदीत पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथे घडली. देविदास बबन वायदंडे (वय ४० रा. गणेगाव खालसा ता. शिरुर जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत सारिका देविदास वायदंडे (वय ३५ रा. गणेगाव खालसा ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
सारिका वायदंडे या कामिनी नदीच्या कडेला कपडे धूत असताना त्यांचे पती देविदास वायदंडे नदीकडे आले. पत्नी सारिका यांच्यासोबत गप्पा मारत असताना देविदास अचानक पाय घसरून नदीत पडले. दरम्यान सारिका यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिकांनी, त्यांना पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी देविदास यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप जगदाळे हे करत आहेत.