मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. लोकसभेला महायुतीची पिछेहाट झाली होती, मात्र या योजनेचे पाठबळ मिळाल्यामुळे महायुतीने राज्यात 288 पैकी 235 जागा मिळवल्याची चर्चा आहे. अशातच या योजनेबद्दल महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. तसेच त्या योजनेतील निकषात बसत नसेल तर संबंधित महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक मदतीसाठी सुरु केलेली लाडकी बहिण योजना एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदतीचा हात देण्यात येतो. या योजनेचा लाभ प्राप्त करणा-या महिलांसाठी आता काही महत्त्वपूर्ण निकषांची पडताळणी करण्यात येणार आहे.
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लवकरच हा लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी अर्थसंकल्पात त्यासंबंधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. मात्र, सरकारला सर्व अर्जांची छाननी करणे शक्य नाही. त्यामुळे या योजनेतील ज्या अर्जांसंदर्भात तक्रार आलेली आहे, त्याच अर्जांची छाननी केली जाईल, असे सांगितले जात आहे.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, त्यांचे सरकार हे लाडकी बहिण योजनेची छाननी करणार आहे. दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या पहिल्या उपाय योजनांपैकी एक म्हणजे लाभार्थ्यांच्या यादीची तपासणी करणे. जे या योजनेत अपात्र आहेत त्यांना बाहेर काढणे. ‘लाभार्थी निकषांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांची छाननी आवश्यक आहे. योजना पूर्णपणे बदलली जाणार नाही.’ असेही बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.