अहिल्यानगर : जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात 8 वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली.
कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना फडणवीस यांनी त्यावेळी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आपली असेल आणि लग्नालाही उपस्थित राहीन, असं आश्वासन दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांनंतर समारंभाला उपस्थित राहून दिलेलं आश्वासन पाळलं आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विवाहाचं निमंत्रण होतं, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो आहे.
काय आहे कोपर्डी प्रकरण? …
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथे जुलै 2016 च्या सायंकाळी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आंदोलन पेटलं होतं. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला होता. तर दोषी असलेल्या तिघांना फाशी दिली तरच आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबानं केली होती. अखेर त्या तीनही आरोपींना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत.