पुणे : पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलने बिल भरले नाही म्हणून ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह ताब्यात दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक जहांगीर रुग्णालयासमोरच उपोषणाला बसले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
जहांगीर हॉस्पिटलमध्ये एका ३५ वर्षीय गृहिणीचे निधन झाले आहे. आज सकाळी (८ डिसेंबर) ९ वाजण्याच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला. मात्र, बिल भरले नाही म्हणून हॉस्पिटलने नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला नाही. या अत्यंत संवेदनशील आणि संतापदायक बाबीचा निषेध करण्यासाठी मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी जहांगीर हॉस्पिटलच्या गेट समोर उपोषण सुरू केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या ३५ वर्षीय महिलेचे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन यशस्वी होईल, असे आत्मविश्वासपूर्वक जहांगीर हॉस्पिटलने महिलेच्या कुटुंबीयांना सांगितले होते. हॉस्पिटलवर विश्वास ठेवून तिच्या कुटुंबीयांनी गेल्या वर्षभरात जहांगीर हॉस्पिटलमध्ये तब्ब्ल ५२ लाख रुपयांपर्यंत खर्च केले आहेत. मात्र, आता मृतदेह मिळवण्यासाठी त्यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत आहे.