पवनानगर : मावळमधील पवना धरणात बोट उलटून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लेक व्हिव सोसायटीमधील सुमती व्हिलाच्या मालक यांच्यासह बोट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमती व्हिलाच्या मालक आरती मंडलीक आणि बोट मालक संतोष चाळके अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, लोणावळा पोलिसांनी कारवाई केली असली तरी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना धरण परिसरात बुधवारी तुषार अहिरे, मयूर भारसाके (दोघे मूळ रा. भुसावळ, जि. जळगाव) हे मित्रांसोबत फिरायला गेले होते. यावेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ त्यांनी लेक एस्केप व्हिला बंगला भाड्याने घेतला होता. बंगल्याच्या आवारातूनच धरणाच्या पाणलोटात उतरण्यासाठी मार्ग आहे. तिथे पाणलोट क्षेत्रात नाव लावली होती.
या नावेतून तुषार, मयूर आणि त्याचे मित्र बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फिरायला गेले. त्यानंतर मयूर भारसाके ज्या नावेत होता, ती नाव अचानक उलटली. यावेळी त्याचा मित्र तुषार त्याला वाचवण्यासाठी गेला. दोघांनी पोहत बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस व शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांनी दोघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तुषार, मयूर दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेस जबाबदार सुमती व्हिलाचे मालक आहेत, अशी तक्रार मृतांच्या नातेवाईकांनी केली होती, त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
म्हणून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई
पवना धराणाचे पाण्यात उतरण्यास मनाई असताना देखील त्यांनी व्हिलामधुन धराणाच्या बॅक वॉटरमध्ये उतरण्यासाठी रस्ता ठेवला. तसेच त्या ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी आहे किंवा पाण्यात उतरू नये, अशा आशायांचे सुचनांचे फलक लावले नाहीत. कोणीही पाण्यात उतरणार नाही, याची काळजी घेण्यासाठी गार्ड नियुक्त केला नाही.
तसेच व्हीला मालकाच्या निष्काळजीपणा तसेच पवना धरणाचे पाण्यात बोट चालवण्यास किंवा नेण्यास मनाई असताना नादुरुस्त अवस्थेतील बोटी उघडयावर ठेवल्या. खबरदारी न घेता किंवा साखळदंडाने बांधल्या नाहीत, म्हणून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.