पुणे : पुणे शहरालगत असलेल्या वडाचीवाडी भागात काळेपडळ पोलिसांनी अवैद्य गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ४ हजार ३४० लिटर गावठी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे १२ हजार लिटरचे रसायन असा ९ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर दोघांना अटक केली आहे.
जगदीश भैरूलाल प्रजापती (वय-२४, रा. काळेपडळ), गुलाव संपकाळ रचपूत (३३, रा. होळकरवाडी) असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नावे आहेत. त्यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून हद्दीत गस्त घालण्यात येत होती. या दरम्यान वडाचीवाडी येथील ओढ्यालगत दोघेजण गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून या भागात छापा टाकला.
त्या वेळी प्रजापती, रचपुत या दोघांना ताब्यात घेतले. येथून पोलिसांनी तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले १२४ कॅन व १२ हजार लिटर कच्चे रसायन, दोन मोबाईल असा ९ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक अनिल निंबाळकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.