-राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील कडेठाण येथे घडलेल्या घटनेनंतर जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीकडे असलेले प्रमाण वाढत आहे. पुणे जिल्ह्यात व दौंड तालुक्यात बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर थांबविण्यासाठी, मानवी वस्तीत वाढलेले प्रमाण पाहता बिबट्या व तत्सम जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे व आवश्यक ठिकाणी पिंजरे लावण्यात यावे, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.
पुणे जिल्ह्यात अनेक भागात तसेच दौंड मतदारसंघातील अनेक गावामंध्ये मानवी वस्तीत बिबट्या व तत्सम जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मागील 6 महिन्याच्या कालावधीत पाळीव प्राण्यांसह नागरिकांवर देखील मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. पूर्वी फक्त जंगलात आढळणारे हे प्राणी आता शेतकऱ्यांच्या शेतात तसेच मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणावर शिरकाव करू लागले आहेत.
सद्यस्थितीत ग्रामीण भागात ऊसतोडणी चालू असून त्यामुळे बिबट्याला वास्तव्यास जागा राहत नसल्याने त्यांचा मुक्त संचार सुरु झाला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू देखील झालेला आहे. हे बिबटे नरभक्षक बनले असून, पाळीव प्राणी व नागरिकांवरील वाढते हल्ले यामुळे होणारे नुकसान लक्षात घेता बिबट्याला पकडण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे व आवश्यक ठिकाणी पिंजरे लावण्याचे गरजेचे आहे.
पुणे जिल्ह्यात व दौंड तालुक्यात बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर थांबविण्यासाठी व बिबट्या व तत्सम जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे व आवश्यक ठिकाणी पिंजरे लावण्यासाठी संबंधितांना विभागांना आदेश व्हावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आमदार राहुल कुल यांनी यावेळी सांगितले.