मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपच्या राहूल नार्वेकर हेच विराजमान होणार हे जवळपास आता निश्चित झालं आहे. महायुतीकडे असलेल्या संख्याबळामुळे राहूल नार्वेकर यांची निवड ही केवळ एक औपचारिकता मानली जात आहे. दुसरा कोणत्याही पक्षाचा अर्ज दाखल झाला नसून, त्यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरला आहे. महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्याचं निश्चित झालं, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अशातच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आज मुख्यमत्र्यांची भेट घेतली. विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही असल्याचं समोर आलं आहे.
राहूल नार्वेकर हे दुसऱ्यांदा विभानसभा अध्यक्षपदी विराजमान होणार असून, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट..
विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागणी केली आहे. यावेळी काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, शिवसेवा (उबाठा) गटाचे अंबादास दानवे यासह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी मागणी केली. यावर सकारात्मक चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या कोअर नेत्यांची बैठक
मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांची अँटी चेंबरमध्ये बैठक सुरू आहे. अंबादास दानवे यांच्या दालनातील अँटी चेंबर मध्ये बैठक सुरू असून, बैठकीत आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत उपस्थित आहेत. उपाध्यक्ष पदाचा निर्णय नक्की होऊ शकतो ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्ष नेतेपदासाठी आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक उत्तर मिळावं. मात्र निर्णय सर्वांना विचारून घेऊ.’ असं भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेबाबत सांगितले.