पुणे : आज डॉ. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते. दरम्यान आज दादर येथील चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार असून सर्व व्यवस्था महानगरपालिका करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौरांनी दिली आहे.
डॉ. आंबेडकर हे तेजस्वी प्रज्ञेचा सागर होते. आजही त्यांचे विचार आणि ग्रंथसंपदा सामान्यांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ आणि प्रेरणा देतात.
सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती
आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.
आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ, आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.
बहुभाषी आंबेडकर..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी भाषा, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.
अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.
सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता – लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप. आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.
इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत. हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.
भारताचे केंद्रीय कायदा व न्यायमंत्री
ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते.
१५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली. आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले.