सोलापूर : ट्रॅक्टरचा अचानक गिअर पडून दोघा बहिणींच्या अंगावरून गेल्याने दोघींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात 7 डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता आष्टे ता. मोहोळ शिवारात घडला. नीता राजू राठोड (वय 20) व आतीश्री राजू राठोड (वय 4) अशी मृतांची नावे आहेत.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, आष्टे ता. मोहोळ येथील कुंडलिक गावडे यांच्या शेतात शानूबाई राठोड व राजू राठोड यांच्या टोळीकडून ऊस तोडणीचे काम सुरू आहे. सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणी संपल्याने उसाच्या फडातील साहित्य गोळा करण्याचे काम सुरू असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच 24 डी 7147 हा बांधावर चालू स्थितीत चालक सुनील गुलाब राठोड यांनी उभा केला होता. त्यावेळी निता राठोड ही आतीश्रीला कडेवर घेऊन ट्रॅक्टरमध्ये चढत असताना, ट्रॅक्टरचा अचानक गिअर पडल्याने ट्रॅक्टर पुढे गेला व तो निता व आतीश्री यांच्या अंगावरून गेला.
त्यामुळे त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून त्या दोघी बहिणी गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सुनील गुलाब राठोड याच्या निष्काळजीपणाने घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात सुनील राठोड (रा. डिग्रस ता. कंधार जिल्हा. नांदेड) यांच्या विरोधात शानुबाई राजू राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटना स्थळाला पोलीस निरीक्षक सुरेश राऊत व पोलीस उपनिरीक्षक आतकरे यांनी भेट देऊन पुढील प्रक्रिया राबविली आहे. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.