मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. मात्र, महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आता भलत्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. शपथविधी सोहळ्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. यात काही महिलांसह 13 जणांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या शपथविधीच्या कार्यक्रमादरम्यान 11 सोन्याच्या चेन आणि 2 पर्ससह 12.4 लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे तक्रारीमधून स्पष्ट झाले आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक मुख्यमंत्री, मंत्री, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि देशभरातील हजारो नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मोठ्या संख्येत नागरिकांनी मुंबईतील आझाद मैदानात गर्दी केली. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. मुंबई पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा तुकड्यांसह चार हजार जवानांचा फौजफाटा तैनात केल्या. कडेकोट बंदोबस्त असूनही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मौल्यवान वस्तू गायब केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एकूण 12 लाखांचा ऐवज लंपास केला, ज्यात सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोकड यांचा समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अधिकारी एस. अहमत अली यांनी दिली. मात्र, चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्याऐवजी पोलिसांनी फोनवर “हरवले” अशी खूण करणारे प्रमाणपत्र जारी केले आणि तक्रारदारांमध्ये असंतोष निर्माण झाला.
या घटनेमुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.