जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यामधील राजकीय संबंधाबाबत असणारे मतभेद सर्वांना सुपरिचित आहेत. अशातच एकनाथ खडसे यांनी फडणवीसांबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, फडणवीसांशी माझे चांगले संबंध आहेत. आम्ही एकमेकांशी बोलतो, मात्र सरकारविषयी भूमिका आली तर व्यक्तिगत एकमेकांशी वैर नसते. राजकारणामध्ये मी अनेकवेळा भूमिका बदलली आहे. कधी मी भाजपमध्ये होतो, कधी राष्ट्रवादीमध्ये होतो, परत भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो राजकीय जीवनामध्ये एकमेकांवर आरोप करताना व्यक्तिगत दोष नसतो, असे एकनाथ खडसे म्हणाले. देवेंद्र फडणवीस व मी एकत्र काम केलं आहे. तात्विक मदभेद असतात ते मिटूही शकतात, असे दिलजमाईचे संकेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून देण्यात आले आहेत.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे तात्विक मतभेद होते, ते आजही आहेत. पुढच्या काळामध्ये तात्विक मतभेद मिटूही शकतील, असे सांगत एकनाथ खडसे यांनी एक प्रकारे दिलजमाईचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे. आमचं भारत-पाकिस्तान सारखं युद्ध चालले नाही. एकमेकांविषयी आमच्यामध्ये काही वेळ तणाव असू शकतो. राजकारणात काही भूमिका वेळेनुसार बदलाव्याही लागत असतात. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
महायुतीला मोठं यश मिळेल असं वाटलं नव्हतं
महायुतीला एवढं मोठं यश मिळेल असं वाटलं नव्हतं. कारण महाराष्ट्राचे चित्र पाहिलं तर महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांचे शेतमालाला भाव नाही, बेरोजगारी कमी झाली नाही. अनेक विषय घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून भूमिका मांडली. परंतु, महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण ही योजना त्यांनी जाहीर केली. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 7500 त्यांनी तीन महिन्यात टाकले. 7500 महिलांच्या खात्यावर जमा झाले, लाडक्या बहिणींनी त्यांना मत दिलं. महिलांना अप्रत्यक्षपणे त्यांनी लाचच दिली. असा गंभीरही आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
ईव्हीएमवर अनेकांनी शंका व्यक्त केली. काही उदाहरणे आहेत ते ईव्हीएम वर शंका उपस्थित करणारी आहेत. ते काहीतरी गडबड घोटाळा झाला आहे, याला बळकटी देणारे आहेत. रोहिदास पाटील यांच्याच गावात त्यांना शून्य मतं मिळाली. कोणीतरी त्यांचा आधार असेल किंवा त्यांनी त्यांना मत देत असेल या ठिकाणी असे चित्र यावेळी दिसून आले. उमेदवाराच्या गावातच त्याला मत मिळालं नाही, जानकरांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे, असेही खडसें यांनी सांगितले.