पुणे : पुण्यातील ओझर येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर मोटरसायकलने कारला जोरदार धडक दिल्याने शिरोली बुद्रुक बोचरे मळा परिसरातील एका व्यक्तीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रामदास निवृत्ती बोचरे (वय-५२) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रामदास हे आपल्या दुचाकीवरून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर डिझेल आणण्यासाठी जात होते. त्यावेळी कारखान्यावरून जुन्नरच्या दिशेला भरधाव वेगाने जात असणाऱ्या मारुती कंपनीच्या इर्टिगा कारने समोरून दुचाकीवरून येणाऱ्या रामदास यांना जोरदार धडक दिली.
दरम्यान, या धडकेत रामदास यांच्या डोक्याला व मांडीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यावेळी या अपघातानंतर त्यांना नारायणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून कार घेऊन पळ काढला. असे तेथील स्थानिक नागरिक सांगत असून ही कार जवळच्याच गावातील असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, कार दुचाकीच्या धडकेत इर्टिगा कारचा टायर फुटला. तरी देखील त्या अवस्थेतही इर्टिगा कारच्या चालकाने कार घेऊन तेथून पळ काढला. तसेच पुढे जाऊन याच कारने दोघांना उडवले असते, पण ते सुदैवाने वाचले. या प्रकरणी पोलिसांनी याचा शोध घ्यावा. अशी मागणी शिरोली बुद्रुक गावातील नागरिक करीत आहेत. या घटनेने शिरोली बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत.