श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील कुरवडे गावाच्या हद्दीमध्ये दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. निखिल राजेंद्र गुरव (३३, रा. हरिहरेश्वर) असे त्याचे नाव आहे. निखिल हा त्याच्या दुचाकीने हरिहरेश्वर येथून श्रीवर्धनकडे जात असताना कुरवडे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात निखील याच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पो.नि. उत्तम रिकामे. स.पो. नि. लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, श्रीवर्धन तालुक्यात ओव्हरलोड बॉक्साईडची वाहतूक सुरू आहे. बॉक्साईडची वाहतूक करणारे वाहन चालक सारे नियम धाब्यावर बसवून येथे वाहने चालवतात. परजिल्ह्यांतून आणलेल्या या अवजड वाहनांमधून श्रीवर्धन तालुक्यातील वडघर पांगलोली येथे बॉक्साईडचा साठा करण्यात येत आहे. असे असताना प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. अशाच एखाद्या वाहनाने निखिलच्या दुचाकीला धडक दिल्याने त्याचा या अपघातात मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच या अपघाताला कारणीभूत असलेल्या वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करू लागले आहेत.