दौंड : दौंड तालुका सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आहे. काही दिवसांपूर्वीच बोरीपार्धी हद्दीत बिबट्याने सहा महिन्याच्या बाळाचा बळी घेतल्यानंतर आता तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेवर बिबट्यांना हल्ला करून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. लताबाई बबन धावडे (वय ५० ,रा. कडेठाण) असं बिबट्याच्या हल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना आज (दि. 7 डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, जी भीती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होती, ती भीती आता खरी ठरू लागली आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे दौंड तालुक्यात दोघांचा निष्पाप बळी गेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दौंड तालुक्यातील कानगाव आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीत शनिवारी (दि. ७) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शेतकरी धावडे यांच्या शेतात काम करणाऱ्या लताबाई धावडे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यानंतर त्यांना उसाच्या शेतात फरफटत नेले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
दौंड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ
गेलं काही महिन्यात दौंड तालुक्यात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भीमा नदीच्या पट्ट्यात असलेल्या दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण, नानगाव, कडेठाण तर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, गणेगाव, सादलगाव, वडगाव रासाई या भागात बिबट्याने तांडव केले आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची शिकार करणारा बिबट्या आता माणसाचीही दिवसाढवळ्या शिकार करू लागला आहे.