लोणी काळभोर: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील संघात फुरसुंगी (ता. हवेली) येथील मंडलाधिकारी म्हणून कार्यरत असलेले नामदेव सोनवणे यांचा मुलगा संस्कार याची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड झाली आहे. यामुळे संस्कार सोनवणेचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संस्कारचे मूळ गाव हे जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी आहे. संस्कारला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ही आवड त्याचे वडील नामदेव सोनवणे यांनी ओळखली. त्याला प्रोत्साहन देऊन सर्वात पहिल्यांदा क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर संस्कार शिर्के इंडस्ट्रिसच्या केडन्स अकॅडमीमध्ये रियाज बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करू लागला. यासाठी संस्कारला प्रशिक्षक निखिल पराडकर, पृथ्वीराज पाटील व फिटनेस प्रशिक्षक दिगंबर वाघमारे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान, सन 2022 मध्ये 14 वर्ष वयोगटातील महाराष्ट्र आमंत्रित स्पर्धेचा अंतिम सामना केडन्सने जिंकला होता. या स्पर्धेत संस्कारने एक शतक व दोन अर्धशतके ठोकून आपली चुणूक दाखवली होती. तर सन 2023 मध्ये झालेल्या 16 वर्ष वयोगटात महाराष्ट्र आमंत्रित स्पर्धा झाली. या स्पर्धेतील एका सामन्यात संस्कारने नाबाद 150 धावांची खेळी केली. संस्कार हा मागील तीन वर्षांपासून केडन्स क्रिकेट क्लब या अकादमीत सराव करत आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA)ने 16 वर्षा खालील मुलांचा महाराष्ट्रचा संघ घोषित केला आहे. त्यामध्ये केडन्स क्रिकेट क्लबच्या संस्कार सोनवणेची विकेट किपर बॅट्समन म्हणून निवड झाली आहे. लवकरच हा संघ सुरत (गुजरात) येथे डिसेंबर 2024 मध्ये होणाऱ्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. अत्यंत छोट्या गावापासून ते थेट विजय मर्चंट ट्रॉफी खेळणारा संस्कार हा गावातील पहिला मुलगा ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.