पुणे : पुणे विमानतळावरील सीआयएसएफ (केंद्रीय सुरक्षा बल) कार्यालय आणि पोलीस चौकीचे नव्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. स्थलांतर झाल्यावर येथील जुनी कार्यालये पाडून याच जागेवर वाहनांसाठी रस्ता करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना नवीन टर्मिनलप्रमाणे जुन्या विमानतळ परिसरातून मोकळा श्वास घेत, विमान प्रवासासाठी ये-जा करता येणार आहे. लोहगाव येथील जुन्या विमानतळ टर्मिनल परिसर रिकामा करण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी येथील सीआयएसएफ कार्यालय, पोलीस चौकीचे स्थलांतर येथेच नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
कार्यालयांचे स्थलांतर झाल्यावर येथील जुन्या इमारतींवर हातोडा पडणार आहे. यानंतर येथील जुन्या इमारतींच्या जागेवरून प्रवाशांची, प्रशासनाची, अधिकाऱ्यांची वाहने ये-जा करण्यासाठी रस्ता तयार करण्यात येणार आहे. यामुळे नवीन टर्मिनलप्रमाणेच जुन्या टर्मिनलसमोरची जागा देखील रिकामी होणार आहे.