पुणे : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रडार तंत्राचा वापर करून वाहनांचा वेग मोजण्यात येत असून, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास अशा वाहनांना ई-चलान देण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर घाट परिसरामध्ये हलके मोटार वाहन (कार) यांची वेग मर्यादा ६० किमी प्रतितास असून, उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा ४० किमी प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलके मोटार वाहन (कार) यांची वेग मर्यादा १०० किमी प्रतितास असून, उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा ८० किमी प्रतितास आहे.
प्रणाली अंतर्गत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना ई-चलान देण्यात येत आहे. तरी सर्व वाहनधारकांनी वाहतूक करताना ‘सर्व नियमांचे पालन करावे व वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत वाहनधारकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.