पुणे : एकतर्फी प्रेमातून बिबवेवाडी परिसरामध्ये १३ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निघृण खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, या प्रकरणातील आरोपीला फिर्यादीने ओळखले आहे. तसेच, शुभम ऊर्फ ऋषिकेश भागवत यानेच आमच्यासमोर मैत्रिणीचा गळा चिरल्याची साक्ष फिर्यादीने दिली आहे. सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंझाड यांनी फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली.
बिबवेवाडी परिसरात एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली हाेती. या घटनेत मृत्युमुखी पडलेली शाळकरी मुलगी राष्ट्रीय कबड्डीपटू होती. ती बिबवेवाडी भागात कबड्डीच्या सरावासाठी गेली होती. शुभम हा दुचाकीवरून त्याच्या दोन अन्य साथीदारांसह घटनास्थळी आला. या वेळी त्याठिकाणी गाडी पार्क करत तो पीडितेच्या दिशेने गेला.
पीडितेने तू इथे का आलास, अशी विचारणा करताच भागवत याने हातातील सुरा घेऊन पीडितेचे तोंड दाबत गळा चिरला. त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदार मित्रांनी तिच्यावर वार केले. त्यानंतर पीडिता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने आम्ही आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या वेळी आमच्या एका सहकाऱ्याने भागवत याच्या हातातून चाकू हिसकाविला
त्यानंतर, भागवत याने पिस्तूल काढत पीडितेच्या मैत्रिणीच्या दिशेने रोखत जवळ आल्यास गोळी झाडण्याची धमकी दिली. भागवत याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेवर चाकूने सपासप वार केले. पीडितेचा जीव गेल्यानंतर आरोपीसह त्यांचे साथीदार घटनास्थळावरून पळ काढल्याची साक्ष फिर्यादी यांनी न्यायालयासमोर दिल्याची माहिती अॅड. झंजाड यांनी दिली आहे.
मयत मुलीने प्रेमास नकार दिला आणि फोनवर बोलण्यास टाळाटाळ केल्याने शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत (वय २२) याने क्रूर पद्धतीने तब्बल ४२ वार करून तिचा निर्घुण खून केला होता. या घटनेने पुण्यासह संपूर्ण राज्यात खळबळ माजवलेल्या गुन्ह्यात भागवतविरोधात आरोप निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर आत्ता सुनावणीस सुरुवात झाली आहे. आरोपीविरोधात खून, जिवे मारण्याची धमकी, शस्त्र अधिनयम, मुंबई पोलिस अधिनियम यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.