लोणी काळभोर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांच्या टोळक्याने एकाला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरा नगर परिसरात गुरुवारी (ता.5) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील दोन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी एका तासाच्या आत अटक केली आहे. तर, या गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
विनोद साहेबराव झेंडे (वय- 38, रा. इंदिरा नगर, लोणी काळभोर, पुणे) व प्रणव दिपक कांबळे (वय-21, सातदेवी मंदिराच्या पाठीमागे, वाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर फिरोज महम्मद शेख (वय 28, घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश रावसाहेब गोडसे (वय -24, लेन नं. 11, घोरपडेवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. मु पो. सोमेवाडी, ता. सांगोला जि. सोलापुर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश गोडसे, फिरोज शेख व प्रसाद जेटीथोर हे तिघेजण एकमेकांचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी फिर्यादी, त्यांचे मित्र व आरोपी विनोद झेंडे, प्रणव कांबळे व त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांशी भांडण होते. या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, फिर्यादी गणेश गोडसे व त्यांचे मित्र गुरुवारी (ता.५) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरत होते. इंदिरानगर परिसरातून जात असताना, आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून रस्त्याच्या कडेला पडलेले दगड उचलून फिर्यादी गणेश गोडसे व त्यांच्या मित्रांना मारहाण केली.
या मारहाणीत फिरोज शेख हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, उजव्या डोळयाजवळ, पोटाजवळ, डाव्या हाताच्या बोटाजवळ, डाव्या पायाच्या अंगठ्या जवळ गंभीर दुखापत झाली. तसेच खूप मोठा रक्तस्राव झाला. फिरोज यांना उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पुजा माळी, अमोल घोडके, रत्नदिप बिराजदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेटी दिल्या. सदर गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी गणेश गोडसे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी विनोद झेंडे, प्रणव कांबळे व तीन अल्पवयीन मुलांवर भारतीय न्याय दंड संहिता कलम 118(2) 189(2) 191(1)(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या एका तासात अटक केली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.