मुंबई : बनावट कागदपत्रे आणि खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करून शासन आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या अंधेरीतील एका शिक्षण संस्थेविरोधात डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ६ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास वत आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, शिक्षण संस्थेतील दोघांसह अन्य आरोपींनी संगनमत करून सन २०१६-१७ ते सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील वाढीव फी फिक्सेशनसाठी कॉलेजमध्ये कामाला नसलेल्या व्यक्ती या कॉलेजमध्ये नॉन टिचिंग स्टाफ वर्गावारीतील लॅब अण्टेडंट किंवा अॅडमीन ऑफिसर अशा पदांवर नोकरीस आहेत, असे भासवले. कॉलेजने त्यांना पगारापोटी प्रतिवर्षी १ कोटी ७ लाख, ६० हजार ४९४ प्रमाणे ६ वर्षांमध्ये सुमारे ६ कोटी रुपये दिले आहेत, अशी खोटी माहिती एफआरएला दिली.
आरोपींनी नॉन चिटिंग स्टाफची नियुक्ती पत्रे, हजेरी पट, पगारपत्रके, नोकरी सोडल्याचे पत्र, पोव्हिडंट फंडाबाबतची कागदपत्रे, बॅलन्सशीट, अशी कागदपत्रे बनावट तयार करून खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी येथे असलेल्या शुल्क नियामक प्राधिकरण (फी रेग्युलेटिंग ऑथर्टी) यांना सन २०१६ ते २०२२ या कालावधीत सादर केली. त्याद्वारे कॉलेजची फी वाढवून घेऊन ही फी विद्यार्थी आणि शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून वसूल केली.