भोसरी : भोसरी परिसरातील इंद्रायणी नगर भागात प्रथमच हरणटोळ जातीचा साप आढळला आहे. ओम पाटील यांना त्यांच्या घरासमोर झाडांवर हिरव्या रंगाचा साप दिसला. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे सचिव सर्पमित्र अमर गोडांबे व सर्पमित्र राजू कदम यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र अमर गोडांबे यांनी तेथे धाव घेत पाहणी केली असता घरासमोरील झाडावर हरणटोळ जातीचा साप असल्याचे दिसून आले.
मात्र, भोसरीत प्रथमच हरणटोळ जातीचा साप आढळून आला असून भीमाशंकर, माथेरान येथील जंगल भागात आढळणारा हा हरणटोळ जातीचा साप वाहणांच्या प्रवासातून येथे आल्याचा अंदाज निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे सचिव सर्पमित्र अमर गोडांबे यांनी वर्तविला आहे. भोसरीत प्रथमच हरणटोळ जातीचा साप आढळून आल्याने सर्पमित्रांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.