पिंपरी : पतीचा पाय दुखत असल्याने उपचारासाठी गावी नेण्याबाबत दिराला फोन केल्याच्या रागातून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी बुधवारी (दि.४) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. जावेद मधू पठाण (वय ४०, रा. मोशी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी जावेद याच्या पत्नीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना बुधवारी (दि. ४) सकाळी मोशी येथे घडली. जावेद याचा उजवा पाय मागील तीन दिवसांपासून दुखत आहे. पायाचे दुखणे वाढत असल्याने त्याला उपचारासाठी मूळ गावी शिंदेवाडी जुन्नर येथे घेऊन जाण्याबाबत जावेद याच्या भावाला त्याच्या पत्नीने फोन केला. या कारणावरून जावेद याने पत्नीला बॅट आणि फरशीने मारून गंभीर जखमी केले. तसेच जावेद याने भावाच्या पत्नीला देखील बॅटने मारून जखमी केले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.