पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत आणि विनापरवाना फ्लेक्सचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. या बेकायदा फ्लेक्स, किऑक्स व होर्डिंगवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश आकाशचिन्ह व परवाना विभागाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात अनेक रस्त्यांवर चौक, मोकळ्या जागा, सीमा भिंत, खांब असे मिळेल त्या जागी फ्लेक्स झळकत आहेत. विजेच्या खांबांवर बेकायदा किऑक्स लटकत आहेत. फ्लेक्स व किऑक्सच्या गर्दीमुळे शहर विद्रुप झाले आहे. त्यामुळे आकाशचिन्ह व परवाना विभाग अॅक्शन मोडवर आला आहे.
महापालिकेने विशेष कारवाई मोहिम हाती घेऊन शहरभरातील बेकायदा होर्डिंग, फ्लेक्स व किऑक्सवर कारवाई केली आहे. परवाना निरीक्षकांसह क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने क्षेत्रीय कार्यालयनिहाय ही धडक कारवाई सुरू आहे. आता बेकायदा होर्डिंग, फ्लेक्स व किऑक्स लावणाऱ्यांवर दंड करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सर्व आठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. बेकायदा होर्डिंग, फ्लेक्स व किऑक्स लावणाऱ्यांना दंड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर तो अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.