लोणी काळभोर : घरफोडी, मोबाईल चोरी गुन्ह्यातील सराईत रेकॉर्डवरील आरोपीला युनिट 6 च्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 05) लोणीकाळभोर हद्दीत करण्यात आली आहे. गुलाम रजा ऊर्फ मसाट मजलुम सय्यद इराणी (वय 26, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असं अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक असे लोणीकाळभोर हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की घरफोडी, मोबाईल चोरी गुन्ह्यातील सराईत रेकॉर्डवरील आरोपी गुलाम इराणी आला आहे.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याला कक्ष कार्यालयात आणून त्याचेकडे पथकाचे मदतीने कौशल्यपुर्ण तपास केला असता वाघोली पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हयांमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे.आरोपीकडुन पंचनाम्या अंतर्गत 1 लाख किमतीचे दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपीला पुढील तपासकामी जप्त मोबाईलसह वाघोली पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट – 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार रमेश मेमाणे यांनी केली आहे.