पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाने पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कविता संजय लोखंडे (वय ३९, रा. सिद्धार्थनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी पती संजय सुदाम लोखंडे (वय ४९) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कविता यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंड दाम्पत्य सिद्धार्थनगरमध्ये राहायला आहेत. आरोपी संजय याला दारू पिण्याचे व्यसन आहे. बुधवारी सकाळी त्याने पत्नी कविता यांच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संजय याने चिडून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करून चाकूने वार केले. पोलीस हवालदार आंग्रे तपास करत आहेत.