परभणी : परभणीच्या गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या घडली होती. या सामूहिक आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेमागील नेमकं कारण तेव्हा उघडकीस आले नव्हते मात्र आता या सामूहिक आत्महत्येचे गूढ अखेर उलगडले आहे. मयत मुलीस माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग वजा धमकी सहन न झाल्याने तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षकीपेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
परभणीच्या गंगाखेड शहरानजीकच्या धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर झोपून २८ नोव्हेंबरला दुपारी ममता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना आणि मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेमुळे गंगाखेडसह संपूर्ण राज्य हादरले होते. आत्महत्या करणारे तुडमे कुटुंब लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनी-कद्दू येथील रहिवासी होते. या तिघाच्या आत्महत्येमुळे तुडमे याच्या नातेवाईकांना मोठा धक्काच बसला. या तिघांच्या मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
तरुणावर गुन्हा दाखल..
या घटनेसंदर्भाने जिल्ह्यासह राज्यभरात तर्कवितर्क लावले जात होते. याप्रकरणी मसनाजी यांचे भाऊ फिर्यादी शिवाजी तुडमे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवम नारायण राऊत (२१, रा परभणी ) या तरुणाविरोधात गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
मात्र तपास करताना पोलिसांना आरोपी तरुणाच्या मोबाइल सीडीआरवरून संशय बळावला. त्यावरून चौकशीसाठी आरोपीस बोलाविले असता संबंधित मुलीस आणि कुटुंबास ब्लॅकमेलिंग करत आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो व्हायरल केल्याचे त्याने कबूल केले. यावरून ४ डिसेंबरला रात्री गंगाखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.