लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात बुधवारी सायंकाळी पाण्यामध्ये बोट उलटून दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बंगला मालक आणि बोट मालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत मयत झालेला तुषार अहिरे याच्या नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे.
मूळचे भुसावळ येथील असलेले तुषार अहिरे आणि मयूर भारसाके हे मित्रांसोबत मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरामध्ये चार डिसेंबर रोजी फिरायला गेले होते. पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या लेक इस्केप व्हिला या बंगल्यात त्यांनी थांबा घेतला होता. सदरचा बंगला हा पवना जलाशयाच्या बॅक वॉटरला लागूनच आहे. तेथूनच थेट धरणामध्ये उतरण्यासाठीचा रस्ता आहे.
नेमकं काय घडलं?
तसेच जलाशयामध्ये सुमती व्हिवा यांची एक बोट देखील होती. तुषार अहिरे, मयूर भारसाके त्यांचा एक मित्र बोट घेऊन पाण्यामध्ये फिरायला गेले होते. बोट उलटून तुषार आणि मयूर हे पाण्यात पडले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे.