मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबरकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्षांना शपथ देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन उद्यापासून (दि. 07 डिसेंबर) सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्रक्रियेचा भाग म्हणून हंगामी अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. आमदार कोळंबकर हे सलग नवव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. ते राजभवनात दुपारी 1 वाजता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.
विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल. 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
कोण आहेत कालिदास कोळंबकर ?
कालिदास कोळंबकर हे 15 व्या विधानसभेतील सर्वात अनुभवी आमदार आहेत. सर्वाधिक आमदारकीचा कार्यकाळ अनुभवला असल्याने कोळंबकर हे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. कालिदास कोळंबकर यांनी शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी 1990 पासून सातत्याने विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर मतदारसंघातील अल्पसंख्यांक उमेदवार पाठिशी राहील, असा विश्वास व्यक्त केला होता.